पिंपरी : पत्नीचा खून करून वेष बदलून राहणाऱ्या आरोपी पतीला तब्बल २७ वर्षांनी अटक केली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने उस्मानाबाद येथे सापळा रचून ही कारवाई केली.
रामा पारप्पा कांबळे (वय ६६, रा. कोळनुर पांढरी, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९५ मध्ये रामा कांबळे याने दगडी उखळ डोक्यात आणि छातीवर मारून पत्नी सुशिलाबाई रामा कांबळे उर्फ लोखंडे हिचा खून केला. यानंतर तो पसार झाला होता. तसेच नाव आणि ठिकाण बदलून पोलिसांना मागील २७ वर्षांपासून गुंगारा देत होता.
दरम्यान, भोसरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी महेश भीमराव कांबळे याच्या शोधासाठी गुन्हे शाखा युनिट एकचे पथक उस्मानाबाद जिल्ह्यातील कोळनुर पांढरी या गावी गेले होते. तेथून महेश कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर रामा कांबळे देखील याच कोळनुर पांढरी या गावचा असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यामुळे पोलिसांनी रामा कांबळे याच्याबाबत गावात विचारपूस केली. रामा कांबळे याने दुसरा विवाह केला आहे. तसेच नाव बदलून मावळ तालुक्यातील उर्से येथे तो गेला आहे. राम कोंडीबा बनसोडे या नावाने उर्से येथील वीटभट्टीवर तो काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी उर्से येथून रामा कांबळे याला ताब्यात घेतले. त्याने एका मुक्या महिलेसोबत विवाह केला असून त्याला तीन मुले असल्याचे त्याने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले. तसेच १९९५ मध्ये भोसरी येथील राहत्या घरी त्यानेच त्याची पत्नी सुशिलाबाईचा खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी रामा याला अटक करून भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.