पिंपरी : हिंजवडी ते चाकण मार्गावर पाच वातानुकूलित बसेस सुरू होणार आहेत. वातानुकूलित बस खरेदीसाठी राज्य सरकारने ३ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच दापोडी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते चिंचवड, एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपूल या मार्गावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहराला लागून असलेल्या चाकण परिसराचे औद्योगिकीकरण झाले आहे. या भागात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे पुणे जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरच नव्हे; तर महाराष्ट्रातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. दुसरीकडे पिंपरी-चिंचवडलाच लागून असलेला हिंजवडीचा परिसरही आयटी हबमुळे जगाच्या नकाशावर झळकलेला आहे. हिंजवडीतही अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. चाकणचे औद्योगिकीकरण आणि हिंजवडी आयटी पार्कमुळे पिंपरी-चिंचवडची भरभराट होत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी दररोज कामांसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वातानुकूलित बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आमदार जगताप म्हणाले, ‘‘चाकण ते हिंजवडी दरम्यान वातानुकूलित बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी चाकण ते हिंजवडी मार्गासाठी पाच वातानुकूलित बस खरेदीला मान्यता दिली आहे. या पाच बसेससाठी ३ कोटी ३० लाखांच्या निधीला मंजुरीही दिली आहे. दापोडी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते चिंचवड, एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपुलाच्या मार्गावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. औंध ऊरो रुग्णालय परिसरात पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामे करण्यासाठी सुद्धा ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रुग्णालयात वैद्यकीय सेवा अद्ययावत करणे, व्हेंटिलेटर सेवा, आयसीयू बेड उपलब्ध करणे, डायलेसिस मशीन पुरवणे, पॅथॉलॉजिकल लॅब तयार करणे, दर्जा वाढ करणे, सुशोभिकरण, अंतर्गत रस्त्यांचा विकास, ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे, पाणीपुरवठा, सुलभ शौचालय, समाजमंदिर दुरूस्ती, पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे.’