ज्ञानेश्वर भंडारे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : रूपीनगर निगडीतील सैनिक अकॅडमीतील विद्यार्थ्यांची सहल देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथे गेली होती. त्यातील काही मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह रविवारी शहरात आणण्यात येणार होते. त्यामुळे निगडीतील अकॅडमी परिसरात दिवसभर परिसरातील नागरिक चकरा मारत होते. कोणी चौकशी करू नये, म्हणून त्या इमारतीवरील अकॅडमीचे बोर्ड काढून टाकण्यात आले होते.
सैनिक अकॅडमीची सहल देवगडला गेली होती. त्यावेळी देवगड समुद्रात आनंद लुण्यासाठी हे सर्वजण उतरले होते. समुद्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने ६ जण बुडाले आहेत. त्या ६ जणांपैकी ४ जणांचे मृतदेह सापडले असून एकाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिषा पवळ, पायल बनसोडे यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर आकाश तुपे याला वाचवण्यात यश आले. बुडालेल्यांपैकी राम डिचवलकर हा मात्र अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.पालकांची धाव देवगडकडे...
घटनेची माहिती मिळताच पालकांनी देवगडकडे धाव घेतली. तर मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह रविवारी रात्री उशिरापर्यंत पोहचणार होती. त्यामुळे अकॅडमी शोधत शोधत काही पालक येत होते. तर अकॅडमीचे बोर्ड काढून टाकण्यात आले होते. तसेच इमारतीला टाळेही लावण्यात आले होते.