नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : सोलर सिस्टम बसवून देणाऱ्या ठेकेदाराला एनओसी देण्यासाठी १० हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा झटका दिला आहे. याप्रकरणी कार्यकारी अभियंत्यावर बुधवारी (दि. ४) चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेंद्र साळुंखे, असे गुन्हा दाखल झालेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार असलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाकडे तक्रार केली होती. एसीबीचे उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र साळुंखे हे एम.एस.ई.डी.एल. गणेश खिंड अर्बन, चाचणी विभाग कार्यालय, चिंचवड गांव येथे कार्यकारी अभियंता (वर्ग १) आहेत. तक्रारदार हे सोलर सिस्टम बसवून देणारे ठेकेदार आहेत. ते ग्राहक व एम.एस.ई.डी.एल. (महावितरण) यांच्यामध्ये लायझनिंगचे काम करतात. तक्रारदार ठेकेदाराने ग्राहकाच्या घरी सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशनच्या कामाची एन.ओ.सी. / तपासणी अहवाल मिळण्याकरीता महावितरण कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला. तसेच त्याचा पाठपुरावा तक्रारदार स्वत: करीत होते. लोकसेवक राजेंद्रकुमार साळुंखे यांनी तक्रारदार ठेकेदाराकडे एन.ओ.सी. व मीटर टेस्टींगसाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत ठेकेदाराने पुणे एसीबीकडे तक्रार केली.
ठेकेदाराने केलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, राजेंद्रकुमार साळुंखे यांनी स्वत:साठी तसेच कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी तक्रारदार ठेकेदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून साळुंखे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.