दिघी : सततच्या रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे दिघी परिसरातील अनेक रस्त्यांवर चिखल होऊन रस्ते निसरडे झाले आहेत. यामुळे अचानक दुचाकी घसरून दुखापत होत असल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. अशा निसरड्या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जिवावर उदार होऊन घेण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे दिघीकरांना प्रवास करावा तरी कसा, हा प्रश्न भेडसावत आहे.आदर्शनगरमधून दिघी रोडला जोडणारा हा मार्ग चिखलाने समृद्ध झाला आहे. रस्त्यावर पडलेला मातीचा भराव चिखलात रूपांतरित झाल्याने सर्व रस्ता निसरडा झाला आहे. रस्त्यावर असणारे मोठे खड्डे व ते चुकविताना घ्यावी लागणारी वळणे यामुळे दुचाकीस्वार पडून जायबंदी होत आहेत.दुचाकी घसरून पडण्याच्या घटना आता सर्रास घडत असल्याने नागरिक दबकूनच प्रवास करीत असल्याचे दिसते. दोन दिवसांपूर्वी तर एकामागे एक अशा तीन घटना घडून दुचाकीस्वार पडल्याचे निदर्शनास आले. चारचाकी वाहनांचे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नुकसान होत असल्याने प्रवास करणे त्रासदायक झाले आहे.विठ्ठल मंदिरापासून खाली छत्रपती संभाजीमहाराज चौकाकडे जाणारा रस्ता, भारतमातानगर, दत्तनगर, सावंत कमानीकडे जाणारा रस्ता व उपनगरातील रस्ते पावसाच्या पाण्याने निसरडे झाले आहेत. या रस्त्यावरुन दुचाकीस्वार कमी वेगाने दुचाकी चालवित असले तरी दुचाकी घसरुन अपघात होत आहेत.भोसरीला कामावर जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. पावसाने रस्त्यावर चिखल झाला आहे. या चिखलामधून गाडी चालवताना कसरत करावी लागते. गाडीला सर्व चिखल लागत असल्याने गाडीचे टायर घसरून पडल्याच्या घटना सारख्या घडतात. रस्त्यावरून गाडी चालवणे कठीण झाले आहे. नवीन शिकलेल्या दुचाकीस्वार किंवा महिलांना तर रस्त्यावर गाडी चालवता येत नाही.- मंगेश काळपांडे,दुचाकीचालक
निसरड्या रस्त्यांमुळे अपघात; दुचाकीस्वार जायबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:56 AM