भोसरी : शाळा सुटली. बसमधून मुले घरी निघाली. रोजचा धिंगाणा सुरू होता. दिवसभरातले शाळेतील, वर्गातील किस्से मुले एकमेकांशी बोलत असतानाच अचानक मोठा आवाज झाला. मुलांच्या अंगाचे पाणी झाले. तर रस्त्यावर असणाऱ्या प्रत्येकाच्याच काळजाचा ठोका चुकला. हा प्रकार चऱ्होलीत इंद्रायणी नदीवर गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडला. बस इंद्रायणी पुलाला धडकली आणि कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर गेली. यावेळी बसमध्ये ७० विद्यार्थी होते. स्कूल बसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर पडले. स्थानिकांची सतर्कता आणि नशीब बलवत्तर म्हणूनच मोठी दुर्घटना टळली.
आळंदी फुलगाव येथे लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे शाळा आणि ज्युनिअर कॉलेज आहे. चऱ्होली, वडमुखवाडी परिसरातील अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये बसने ये-जा करतात. गुरुवारी नेहमीप्रमाणेच या शाळेतील काही विद्यार्थी बसने शाळा सुटल्यानंतर घरी परतत होते. लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजची स्कूल बस आळंदी-मरकळ रोडने विद्यार्थी घेऊन जात होती. चऱ्होली येथील दाभाडे सरकार चौकाजवळ इंद्रायणी नदीवर बस आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. स्कूल बसने नदीवरील पुलाच्या कठड्याला धडक दिली. धडक दिल्यानंतर जोरात आवाज झाला. चालकाने गाडी नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे एकच गोंधळ झाला आणि विद्यार्थीही गडबडून गेले. बस धडकल्यानंतर आवाज झाला आणि विद्यार्थी घाबरले, त्यांनी एकच गोंधळ सुरू केला. विद्यार्थ्यांच्या आवाजामुळे आसपासचे नागरिक गोळा झाले. स्थानिकांनी तातडीने सतर्कता दाखवत स्कूल बसला क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्याचा प्रयत्न केला.
स्थानिकांची सतर्कता
रस्त्यावरील स्थानिक नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. बाहेरून विद्यार्थ्यांना शांत राहण्यास सांगण्यात आले. यावेळी चऱ्होलीतील तुषार दाभाडे, सुशील निगडे, विष्णू तापकीर, संकेत तापकीर, सागर दाभाडे, सूरज दाभाडे, ओंकार भुजबळ, सुनील गावडे यांनी स्कूल बसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न स्थानिकांच्या माध्यमातून करण्यात आला. तोवर क्रेनची व्यवस्था करण्यात आली.
सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. काळ आला होता; पण वेळ नाही असेच म्हणावे लागेल. शाळा आस्थापनांनी अशा प्रकारांना गांभीर्याने घ्यावे. शाळेच्या बसचालक वाहक यांच्याबाबत कटाक्षाने काही नियम पाळावेत. त्यातून कुठलीही दुर्घटना होणार नाही एवढीच काळजी घ्यावी.- नितीन काळजे, माजी महापौर