उर्से : भरधाव वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ओझर्डे गावच्या हद्दीत शनिवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. बिबट्याच्या तोंडाला व डोक्याला जबर मार लागल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच द्रुतगती महामार्गावरील पोलीस कर्मचारी मनोज गुरव, बाळासाहेब अरगडे, स्वप्निल गरुड, आयआरबीचे कर्मचारी ज्योतिबा वाळुंज, अजय मुऱ्हे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, बघ्यांचीही गर्दी वाढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. सुमारे दीड तासानंतर वनविभागाचे कर्मचारी आल्यानंतर बिबट्याला रुग्णवाहिकेतून कामशेत येथे नेण्यात आले. या ठिकाणी केलेल्या प्राथमिक तपासणीत डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याचे निष्पन्न झाले. तसेच डाव्या पायाला एक जुनी जखम असल्याचे दिसून आले. याबाबत वडगाव वनक्षेत्रपाल वडगाव सोमनाथ ताकवले म्हणाले की, आयआरबीने रस्त्याच्या सर्व बाजूंनी जाळ्या बसविणे अत्यंत गरजेचे आहे. वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ येत असल्याने हे अपघात होत आहेत. द्रुतगती महामार्गामुळे १५ वर्षांत अनेक वन्यप्राण्यांना या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला आहे. (वार्ताहर)
‘द्रुतगती’वर बिबट्याचा अपघाती मृत्यू
By admin | Published: March 12, 2017 3:23 AM