पिंपरी : गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) पुणे येथे कार्यरत असलेल्या एका पोलिस अंमलदाराचा पिंपळे सौदागर येथे अपघाती मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ७) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली. सचिन विष्णू माने (वय ४३, रा. आदित्य अपार्टमेंट, स्पाईन रोड, मोशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, सचिन माने हे त्यांच्या वडिलांना त्यांच्या बहिणीच्या घरी सोडण्यासाठी रविवारी रात्री गेले. वडिलांना बहिणीच्या घरी सोडून परत त्यांच्या मोशी येथील घरी दुचाकी (एमएच १२/युबी ४०६९) वरून जात होते. कोकणे चौक ते नाशिक फाटा या दरम्यान जात असताना पिंपळे सौदागर येथील पीके चौकाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांच्या तोंडाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावली आणि सचिन माने यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सचिन माने हे सन २००३ मध्ये पोलिस दलात भरती झाले होते. पुणे शहर पोलिस दलाच्या मोटार परिवहन (एमटी) विभागात नियुक्तीस होते. सध्या ते पुणे एमटी तर्फे सीआयडी पुणे येथे कार्यरत होते. सचिन माने यांच्या मागे त्यांचे आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी जेजुरी येथे होणार आहे.