पिंपरी : भावाचा लग्नसोहळा पार पाडून घरी परतणाऱ्या तरुणाचा अपघातीमृत्यू झाला. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबई - पुणे महामार्गावर कान्हे फाट्याजवळ हा अपघात झाला. या घटनेने लग्न घरावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप अर्जुन जाधव (वय २६, रा. कशाळ) असे मृताचे नाव आहे. संदीपच्या भावाचे लग्न कामशेतच्या गुरुदत्त मंगल कार्यालयात पार पडले. सकाळी साखरपुडा, हळदी समारंभ आणि सायंकाळी विवाह पार पडला. संदीपचे वडील अर्जुन जाधव हे गेल्या तीन वर्षांपासून अंथरूणाला खिळून आहेत. त्यामुळे संदीपने आपला भाऊ दत्ता याचा विवाह सोहळा स्वत: पार पाडला. विवाह सोहळा झाल्यावर रुखवतातील सामान त्याने टेंपोतून घरी पाठविले आणि त्यामागोमाग तोही दुचाकीवरुन निघाला होता. त्याच वेळी भरधाव जाणाठया वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
भावाच्या लग्नावरुन परतणाऱ्या तरुणाचा अपघाती म़ृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 19:52 IST