पिंपरी : शहरात तीन वेगवेगळे अपघात झाले. यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. सांगवी, चिखली आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी रविवारी (दि. ७) प्रत्येकी या गुन्हा दाखल करण्यात आला. शरद पंडित कांबळे (वय ४०, रा. दत्तनगर कॉलनी, रहाटणी फाटा, काळेवाडी), असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचा नाव आहे. पोलीस हवालदार सतीश मापारी यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद कांबळे हे शुक्रवारी (दि. ५) पुणे येथून वाकडकडे जात असताना औंध हॉस्पिटलजवळ पोस्ट ऑफिससमोर त्यांची दुचाकी घसरून ते खाली पडले. यात गंभीर जखमी झाल्याने शरद कांबळे यांचा मृत्यू झाला.
बापू नाना तापकिरे (वय ५०, रा. मिलिंद नगर, ओटास्कीम, निगडी) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रिक्षाचालकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह आरोपीच्या रिक्षाने पाटीलनगर, चिखली येथे मुलीला भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपीने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून पुढे असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात रिक्षातील फिर्यादी जखमी झाले.
नेर येथे शनिवारी (दि. ६) दुपारी सव्वाचारच्या सुमारास अपघात झाला. याप्रकरणी जखमी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष बबन वाघोले (वय ३१, रा. दारुंब्रे) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने त्याच्याकडील चारचाकी वाहन बेदरकारपणे चालवून फिर्यादीला दुखापत केली.