पिंपरी : वस्तू व सेवा कराबाबत (जीएसटी) जनजागृती व्हावी यासाठी केंद्रीय अबकारी विभाग व सेवाकर विभागाच्या पुणे आयुक्तालय दोनच्या वतीने शुक्रवारी रॅली काढण्यात आली. आकुर्डीतील कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. आकुर्डीसह भोसरी, दापोडी, कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चाकण आदी भागात जीएसटीबाबत जनजागृती करण्यात आली. यामध्ये अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. जीएसटी या एकत्रित करप्रणालीसाठी व्यापाऱ्यांनी नोंदणी करावी, सर्वांनी जीएसटीच्या कक्षेत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निर्माता आणि पुरवठादारांपासून ते ग्राहकांपर्यंत सर्वांना अनेक करांऐवजी आता एकच कर भरावा लागणार असून, यामुळे त्रासदेखील कमी होणार आहे. वस्तू व सेवाकरात केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांवर आतापर्यंत येणारे विविध करांचा बोजा कमी होणार असून, उत्पादनांच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, या करप्रणालीबाबत विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. पत्रकवाटप, मोबाइल व्हॅनद्वारे मार्गदर्शन यासह मेळावेदेखील आयोजित केले जात आहे. (प्रतिनिधी)
जीएसटीबाबत आकुर्डीत जनजागृती
By admin | Published: March 25, 2017 3:45 AM