पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी पॅरोल रजेवर तुरुंगातून बाहेर आला. तो तुरुंगात परतलाच नाही. पाच वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनीअटक केली आहे.मल्हारी काशीनाथ जाधव (वय ५८, रा. नढे नगर, पिंपरी) असे अटक केलेल्या फरार कैद्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस देहूरोड परिसरात शुक्रवारी (दि. ७) गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी सावन राठोड आणि गणेश मालुसरे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती देहूरोड येथे येणार आहे. तो नाशिक कारागृहातून पॅरोल रजेवर आला असून पाच वर्षांपासून तो अद्याप कारागृहात परतलेला नाही. त्यानुसार पोलिसांनी देहूरोड परिसरात सापळा रचून मल्हारी याला ताब्यात घेतले.१९९२ मध्ये झालेल्या खूनप्रकरणी मुलूंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी मल्हारी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली. शिक्षा भोगत असताना २०१५ मध्ये तो पॅरोल रजेवर तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर तो फरार झाला. त्याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या मल्हारी याला युनिट पाचच्या पोलिसांनी मल्हारी याला अटक करून मुलुंड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी सावन राठोड, गणेश मालुसरे, मयुर वाडकर, फारुक मुल्ला, संदीप ठाकरे, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, दयानंद खेडकर, राजकुमार इघारे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, भरत माने, श्यामसुंदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
पॅरोल रजेवर तुरुंगातून पाच वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 7:52 PM
खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची भोगत होता शिक्षा
ठळक मुद्देपिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांची कारवाई :