पिंपरी : तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणाऱ्या सराईत गुन्हेगाराने पोलिसांना धक्काबुक्की केली. पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि. ३०) पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडली. सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली.
सलीम पापा शेख (वय ३६, रा. पिंपळे सौदागर), असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीस नाईक श्याम रमणलाल साळुंके यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी शेख हा सराईत गुन्हेगार असून, त्याला पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर व पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र त्या आदेशाचे उल्लंघन करून पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता पिंपळे सौदागर येथे वावरत होता.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी पोलीस नाईक साळुंके यांना धक्का मारून निघून जाऊ लागला. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने त्याला अटकाव केला असता आरोपीने कोयत्याचा धाक दाखवला. सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक काळू गवारी तपास करीत आहेत.