पिंपरी : फ्लॅट घेण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. मात्र माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गेल्या महिन्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचा यात समावेश आहे.
याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १२) फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवाहितेचा पती युवराज भगवान दाखले (वय ३७), सासरा भगवान येडबा दाखले (वय ६०), सासू पुतळाबाई भगवान दाखले (वय ५६, सर्व रा. काळेवाडी), नणंद चांदणी रामचंद्र शेंडगे (वय ३६), रामचंद्र दशरथ शेंडगे (वय ४०, रा. वाकड), अशी आरोपींची नावे आहेत.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला वारंवार वेगवेगळ्या कारणासाठी तसेच फ्लॅट घेण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. मात्र फिर्यादीने माहेरून पैसे आणण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी शिवीगाळ व मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. काळेवाडी येथे २० नोव्हेंबर २००८ ते १२ एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
आरोपी पती युवराज दाखले हा शिवशाही व्यापारी संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे. युट्यूबवर आक्षेपार्ह वक्तव्य करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केल्याप्रकरणी युवराज दाखले याच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात ४ मार्च २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटक देखील केली होती.