नारायण बडगुजर
पिंपरी : विविध गुन्ह्यातील आरोपींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अशा आरोपींना जास्त दिवस रुग्णालयात उपचार करायचे असल्यास पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल केले जाते. यात पिंपरी-चिंचवडपोलिसांची दमछाक होते. आरोपी, गुन्हेगार यांच्यावर उपचारासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात स्वंतत्र वार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
महापालिका तसेच शासकीय रुग्णालयात कारागृहतील कैद्यांसाठी विशेष वॉर्ड असतो. काही विशिष्ट गुन्हेगार, आरोपी सातत्याने या ठिकाणी दाखल होत असतात. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध गुन्ह्यांतील आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर तुरुंगात रवानगी होते. यातील काही आरोपी तब्येत खराब झाल्याचे सांगतात. यात व्हाईट काॅलर आरोपी जास्त आहेत. तब्येत अचानक खराब झाल्याचे ते सांगतात. पोलीस त्यांना रुग्णालयात नेतात. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार केले जातात. काही प्रकरणांमध्ये आरोपींना जास्त दिवस उपचाराची आवश्यकता असते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आरोपी, गुन्हेगार रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड नाही. केवळ प्राथमिक उपचार किंवा अतितातडीच्या प्रसंगात अशा रुग्णांवर उपचार केले जातात. त्यानंतर संबंधिताला रुग्णालयात दाखल करून उपचार करायची आवश्यकता असल्यास पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले जाते. तेथे अशा रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड आहे. रुग्णालयातील या वार्डसाठी पोलीस कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. त्यांच्याकडून तेथे बंदोबस्त करून संबंधित रुग्णांवर ‘वाॅच’ ठेवला जातो.
ना पुरेसे कर्मचारी, ना वाहन
आरोपीला उपचारासाठी पुणे येथे घेऊन जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून स्वतंत्र वाहन, रुग्णवाहिका, आवश्यकतेनुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी दिले जातात. त्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. पुरेसे कर्मचारी किंवा वाहन वेळेत उपलब्ध होत नाहीत.
‘वायसीएम’ रुग्णालय यंत्रणेवर ताण
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयाच्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण आहे. अशातच शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यापासून त्यात भर पडली आहे. आरोपींना वैद्यकीय तपासणी, उपचार अशा विविध कारणांसाठी या रुग्णालयात नेले जाते.
''आयुक्तालयाच्या हद्दीतील आरोपींवर शहरातच उपचार झाले पाहिजेत. याबाबत महापालिकेकडे पत्रव्यहार करणार आहे. तसेच यासाठी आवश्यक वाहन, पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येईल पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. ''