पिंपरी : गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांनी दोघांना पकडून पोलिस चौकीत आणले. मात्र, नशेत असलेल्या आरोपीने पोलिसाची कॉलर पकडून ‘तुला दाखवतो, माझी खूप मोठी ओळख आहे’ असे म्हणत पोलिस कर्मचाऱ्याच्या शर्टाचे बटण तोडले. ही घटना बुधवारी (दि.२६) बावधन पोलिस चौकी येथे रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पोलिस शिपाई उदयराज दीपक माने (वय ३२) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अमर आबासाहेब दुबल (वय ३०), गोरख नामदेव गाजरे (वय २६ वडगाव ब्रु.) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हिंजवडी पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या कॉलच्या पूर्ततेसाठी मार्शलसह सुतारवाडी येथे गेले होते. त्यांनी कॉल करणारे आणि विरोधक यांना तक्रार नोंदविण्यासाठी बावधन पोलिस चौकीत नेले. आरोपी अमर आणि त्याचा मित्र गोरख यांनी दारूसारख्या मादक पदार्थाचे सेवन केले होते. गोरख हा नशेत फिर्यादींच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला. फिर्यादी गणवेशात असताना त्यांची कॉलरकडून गणवेशाची बटणे आणि नेमप्लेट तोडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.