पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून युवकाच्या डोक्यात कठीण वस्तूचा प्रहार करुन खून करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट ४ने अवघ्या आठ तासांत जेरबंद केले. अक्षय अशोक नाईक (वय २३, रा. जिल्हा सरकारी रुग्णालयामागे, सर्व्हंट क्वार्टर, सांगवी फाटा, अौंध), विक्रम उर्फ बिकू श्रीकेसरीन सिंग (वय १८, रा. रेल्वे क्रॉसिंग गेट समोर, बोपोडी) अशी आरोपींची नावे आहे.
अौंध रुग्णालयाच्या आवारात दहा डिसेंबरला रात्री अकराच्या सुमारास शेखर उर्फ बबलू मनोहर चंदाले (वय २७, रा. सांगवी) याचा खून झाला होता. रुग्णालय आवारातच खून झाल्याने भीतीचे वातावरण होते. या गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत होता. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी मोबाईल फोन बंद केला होता. त्यामुळे त्यांचा शोध घेणे अवघड झाले होते. आरोपींच्या मित्रांकडे त्यांच्या लपून बसण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची माहिती घेणे सुरु केले. त्यावेळी आरोपी बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावरील नाल्याच्या कडेला लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्या. जुन्या भांडणाच्या रागातून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. खून झालेल्या व्यक्तीवर सांगवी पोलीस ठाण्यात एक मारामारीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-४चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी दिली.