वाकड : एकतर्फी प्रेमातून १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा गळा चिरून निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला २४ तासाच्या आत बेड्या ठोकण्यात निगडी पोलिसांना यश आले. वेदांत जयवंत भोसले (वय १५, रा. स्वामी विहार, बी विंग पूर्णानगर, चिंच वड) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून पूर्णानगर येथे सोमवारी (दि १२) मध्यरात्री बाराच्या सुमारास धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी रोहन प्रदीप म्हाळगीकर (वय १८ रा. शिवतीर्थ नगर, मूळ लातूर) याला अटक करण्यात आली आहे. वेदांतची आई जान्हवी जयवंत भोसले (वय ४०) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वेदांतच्या वर्ग मैत्रिणीवर आरोपीचे एकतर्फी प्रेम असल्याने या दोघांचे एकत्र येणे-जाणे सोबत राहणे आरोपीला खटकत होते. त्याच्या मनात वेदांत बाबत चीड निर्माण होत याच रागातून आरोपीने वेदांतचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार,वेदांत हा यमुना नगर येथील अमृत विद्यालयात इयत्ता १० वीत शिकत होता. त्याची परीक्षा असल्याने तो व त्याची वर्ग मैत्रीण दोघेही वेदांतच्या घरी अभ्यास करीत असत. दरम्यान, सोमवारी रात्री बाराच्या सुमारास अभ्यास करून झाल्यानंतर वेदांत मैत्रिणीला दुसऱ्या दुचाकीवरून सोडवायला गेल्याचे आरोपीने पाहिले. वेदांत परत येईपर्यंत आरोपी येथे दबा धरून बसला होता. वेदांत येताच त्याने त्याला लिफ्ट मागत काही अंतरावर जाताच त्याच्याकडील चाकूने गळा चिरला. तसेच दंडावर, कमरेवर पाठीत भोसकून आरोपी फरार झाला. बराच वेळ होऊ नही वेदांत परत आला नाही. व त्याचा मोबाईल लागत नसल्याने आई जान्हवी त्याला पाहायला गेल्या असता काही अंतरावर वेदांत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. उपचारासाठी त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ही घटना घडल्याने आरोपी अज्ञात होता. आरोपी बाबत पोलिसांकडे कोणतेही धागे दोरे नव्हते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी आरोपीच्या शोधात लावलेल्या दोन पथकांमार्फत तपास सुरु केला. त्यावेळी पोलीस नाईक संदीप पाटील विलास केकाण यांना आरोपी हा मयत वेदांत व त्याच्या मैत्रिणीचाच मित्र असून एकतर्फी प्रेमातून त्याने हे कृत्य केले असल्याची खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत मिळाली. त्यामुळे आरोपी राहत असलेल्या परिसरातून पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याचे कबुल केले. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे, सहायक निरीक्षक देवेंद्र चव्हाण, योगेश आव्हाड, उपनिरीक्षक विवेक वलटे, तात्या तापकीर, किशोर पढेर, संदीप, पाटील, बाबा चव्हाण, विलास केकाण, चेतन मुढे, अमर कांबळे, किरण खेडकर, रमेश मासवकर, मच्छिंद्र घनवट यांच्या पथकाने केली.
आरोपी हा मूळचा लातूरचा असून तो येथे मावशीकडे शिक्षणानिमित्त वास्तव्यास आहे. तो पिंपरीतील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिकत आहे. आरोपी राहत असलेल्या मावशीचे या परिसरात छोटेशा डेअरी वजा दूध व्यवसायाचा गाळा असल्याने आरोपी कॉलेज करून उरल्या वेळात तो या गाळ्यात बसत असे यातूनच या सर्वांची ओळख झाली होती.
रात्री साडे बाराच्या सुमारास वेदांतला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच जमलेल्या नातेवाईकांच्या रडण्याने रुग्णालय परिसरातील वातावरण धीर गंभीर झाले. अशातही वेदांतच्या आई जान्हवी भोसले ह्या अरे थोडा तरी जीव असेल रे त्याला नीट बघा आणि उपचार कराअसे डॉक्टरांना आणि नातेवाईकांना विनवीत माझं बाळ वाचेल असे म्हणत हंबरडा फोडत होत्या.