पिंपरी : मॉर्निंग वॉकच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या ७० नागरिकांवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही बेशिस्त नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पीसीएनटीडीए सर्कल, मोशी प्राधिकरण, मोशी येथे मॉर्निंग वॉकनिमित्त घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. अशा ७० नागरिकांना पोलीस ठाण्यात आणून कोरोना रोखण्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच कठोर निर्बंधांचे महत्व पटवून देण्यात आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल डेरे, पोलीस कर्मचारी दिनेश मुंडे, पुना हगवणे, जयदीप खांबट, सागर कोळी, सुनील कोळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.