पिंपरी : देशी विदेशी दारु, हातभट्टी विकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा हातोडा उगारला आहे. शहरातील आणखी पाच विक्रेत्यांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सह्याद्री हॉटेलमागे दारु विक्री केल्या प्रकरणी दिलीप उंब्राटकर (वय ३४, रा. मोरया सोसायटी, देहूरोड) याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीकडून देशी दारुच्या चौदाशे रुपये किंमतीच्या ३७ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
चऱ्होली गावाच्या परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये देशी दारु आणि हातभट्टीची विक्री केल्या प्रकरणी आळंदी पोलिसांनी विनोद प्रभू नट (वय २७, रा. मरकळ रस्ता चऱ्होली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून देशी दारुच्या पंधरा आणि हातभट्टीची तीस लिटर दारु असा अडीच हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
आढले गावच्या हद्दीतील गारकर माथ्यावर हातभट्टी विकल्याच्या आरोपावरुन छगन भिका वाघमारे (रा. आढलेता, मावळ) याच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीकडून चोवीसशे रुपये किंमतीची तीस लिटर दारु जप्त करण्यात आली.
आढले रस्त्यावरील बेबडओव्हळ येथे देशी दारु विकल्या प्रकरणी अविनाश नारायण घारेरा (रा. मावळ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याकडून चौदाशे रुपयांच्या देशी दारुच्या २७ बाटल्या जप्त करण्यात आल्या. परंदवडी गावातील संकेत हॉटेल समोर देशी विदेशी दारुची विक्री केल्या प्रकरणी संदीप बाळू कारके (वय ३४), प्रदीप लोहार (दोघे रा. परंदवडी, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून देशी विदेशी दारुचा बत्तीसशे रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला.