पिंपरी : महापालिकेची मुदत संपलेली आहे. त्यामुळे राहुल कलाटे यांच्याकडे सध्या शिवसेनेचे नगरसेवक पद नाही, शिवाय ते सध्या शिवसेनेचे गटनेतेही नाहीत. त्यामुळे पद काढून त्यांच्यावर कारवाई करणे शक्य नाही. मात्र, निवडणुकीत त्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे त्यांच्यावर मुंबईतून, शिवसेना भवनातून कारवाई पुढील दोन दिवसांत करण्यात येईल, असे स्पष्टीकरण ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन आहिर यांनी दिले. शिवाय शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही आहिर यांनी सांगितले.
उमेदवारी पाठीमागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसेच संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी मनधरणी करूनही राहूल कलाटे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली नाही. त्यामुळे आता कलाटे यांच्यावर पक्ष काय करावाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून राहुल कलाटे यांनी केलेल्या बंडखोरीवर पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. या पत्रकार परिषदेला शिवसेना (ठाकरेगट) संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्यासह शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते.
सचिन अहिर म्हणाले की, चिंचवडची जागा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार नाना काटे लढत आहेत. त्यांना शिवसेनाचा संपूर्ण पाठींबा आहे. राहुल कलाटे यांच्यासोबत जे कार्यकर्ते, पदाधिकारी गेले आहेत. त्यांची समजूत घालण्यात येईल. गैरसमजातून केवळ चार ते पाच टक्के कार्यकर्ते कलाटे यांच्यासोबत गेले आहेत. त्यांची गैरसमजूत स्थानिक पदाधिकारी बोलून दूर करतील. महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे पुढील आठवड्यात रोड शो करतील.
सुनील शेळके म्हणाले, राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून आम्ही देखील प्रयत्न करत होतो. मात्र, आता वेळ गेली असून त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे कोणीही त्यांच्या बंडखोरीला बळी पडू नये. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे नाना काटे यांच्यासोबत ठामपणे उभे राहतील.