लोणावळा : मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाका येथे सिगारेटचा कंटेनर लुटणाऱ्या टोळीच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ च्या कायद्यान्वे कारवाई करत दोषारोप शिवाजीनगर विशेष सत्र न्यायालयात पाठविण्यात आले असल्याचीमाहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिली.शाहरूख रज्जाक शेख, शाहेद खान जाहेदखान पठाण, इब्राम रुस्तुम शेख, विकास जालिंदर मुळे, फारूख दिलवार पिंजारी, सुलतान आयुब पठाण, तन्वीर मोहम्मद हनिफ रंगरेज, संदीप ऊर्फ खुकार विजय वाघमारे, बंटी ऊर्फ सागर सोना पगारे, महंमद मौलाना, पट्यार ऊर्फ विजय लक्ष्मण इस्टे, विवेक बाळासाहेब परदेशी (सर्व राहणार कोपरगाव, ता. कोपरगाव, जिल्हा अहमदनगर) अशी ही कारवाई केलेल्या बारा जणांची नावे आहेत.८ सप्टेंबर २०१७ च्या रात्री या सर्वांनी वरसोली टोलनाक्याजवळील अरुणोदय ढाब्याजवळ मुंबई येथून रांजनगाव एमआयडीसीमध्ये १ कोटी ८७ लाख ५४ हजार ८७१ रुपयांचे ८६५ सिगारेटचे कार्टून घेऊन निघालेले कंटेनर क्र. (एमएच १२ एचडी ६००८) हा स्कॉर्पिओ गाडी आडवी लावत कंटेनर चालक कमाल अहमददशमी खान (वय ४१, रा. धारावी मुंबई) याला बेदम मारहाण करत त्यांचा मोबाइल काढून घेतला व हातपाय बांधून गाडीत कोंबत नाशिक टोलनाका परिसरात त्याला सोडून ते कंटेनर घेऊन पसार झाले होते.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर अधीक्षक तेजस्विनी सातपुते, लोणावळा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणच्या सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील व विविध पथकानी सर्व आरोपी अटक केले. त्यांच्यावर शिर्डी, लोणी, श्रीरामपूर, कोपरगाव, नारायणगाव, खांदेश आदी पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. ही संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्याकरिता उपअधीक्षक शिवथरे यांनी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
महामार्गावरील चोरट्यांवर मोक्का, संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 5:18 AM