लोकमत न्यूज नेटवर्ककामशेत : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथील मुख्य रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणे एक महिन्याच्या आत काढण्याची ग्वाही उपस्थित नागरिकांना दिली होती. त्याला महिन्यापेक्षा जास्त काळ उलटूनही कोणतीच कारवाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा आहेत.कामशेत हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. अनेक महत्त्वाची ठिकाणे असल्याने विद्यार्थी, नोकरदार वर्ग, शेतकरी, व्यावसायिक आदींची शहरात मोठी वर्दळ असते. शहरातील प्रमुख रस्ता हा पूर्वीचा जुना मुंबई-पुणे महामार्ग असल्याने पूर्वी दुतर्फा बाजारपेठ वसली आहे. पण, गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यावर अनेक दुकानदारांनी अतिक्रमण केले असून मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. वाढत्या अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद झाला असून, साइडपट्ट्यांवर व्यावसायिकांची अतिक्रमणे वाढल्याने तो आणखी आक्रसला आहे. अनेक दुकानांच्या पायऱ्या रस्त्यावर आल्या आहेत. कित्येक दुकानदारांच्या दुकानातील माल हा नेहमीच रस्त्यावर मांडण्यात येतो. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी मार्ग उरलाच नाही. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना वाहन लावण्यासाठीची जागाही राहिली नाही. त्यांना वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. धनिक व प्रतिष्ठितांच्या चारचाकी रस्त्यामध्ये उभी राहत असल्याने शहरात वाहतूककोंडी नित्याचीच आहे. त्यात बेशिस्त वाहनचालक भर घालत असून शहरात दिवसातील ठरावीक वेळेत व ठराविक ठिकाणची वाहतूककोंडी सोडवणे पोलिसांना झेपत नाही.प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अतिक्रमणांमध्ये वाढ होऊन, तसेच इतर कारणाने वाहतूककोंडीची समस्या गंभीर झाली आहे. काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व टपऱ्या हटवण्यात आल्या; तसेच इतर सुमारे ५०० अतिक्रमणे पाडली होती. बाजारपेठेतील अनेकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. पण गरिबांच्या टपऱ्या, दुकाने हटवून धनिकांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा केल्याचा आरोप अनेक टपरीचालक व व्यावसायिकांनी केला होता. छत्रपती संभाजीमहाराज चौक, छत्रपती शिवाजीमहाराज चौक, पवना फाटा चौक, गणपती चौक, मच्छी मार्केट, साईबाबा चौक, बाजारपेठ आदी प्रमुख ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या मोठी असून सार्वजनिक बांधकामने छत्रपती शिवाजीमहाराज चौकातच कारवाई केली, असा आरोप छोटे व्यावसायिक करीत आहेत.
महिना उलटूनही होत नाही कारवाई
By admin | Published: May 12, 2017 5:03 AM