पिंपरी - लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेने चिंचवड, पिंपरी आणि भोसरी अशा तीनही मतदार संघातील सहाशे दहा राजकीय फ्लेक्स काढून टाकण्यात आले आहेत. या दैनंदिन कारवाईचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक जाहीर केली. त्यानंतर महापालिकेने आचारसंहिता कक्षही सुरू केला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील फलकवाल्यांची बैठक घेऊन राजकीय फलक तातडीने हटवावेत, अशा सूचनाही दिला होत्या. तसेच निवडणूक विभागास आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते.आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४८ तासांत कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. मालमत्ता व आवारातील राजकीय नेत्यांचे फोटो, बॅनर्स काढण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या होत्या. त्यानुसार पहिल्याच दिवशी महापालिका भवनातील महापौर, पक्षनेते, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, विविध समितींचे सभापती यांच्या कार्यालयातील फोटो काढले होते. तसेच महापालिकेच्या महापालिका पदाधिकाऱ्यांच्या दालनातील राजकीय छायाचित्रे झाकली आहेत.७२ तासांचा अवधी : मुदतीनंतर कारवाईपिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावलेले पोस्टर्स, बॅनर्स, अनधिकृत फ्लेक्स हटविण्यासाठी ४८ तासांची मुदत आहे. तर खासगी जागेत लावलेले फ्लेक्स हटविण्यासाठी ७२ तासांची मुदत देण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतरही अनेक राजकीय बॅनर्स आढळून आल्याने ही कारवाई केली आहे. या कारवाईत सातत्य ठेवले जाणार आहे. शहराच्या विविध भागांत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांत महापालिकेने सहाशे दहा राजकीय फ्लेक्सवर कारवाई केली आहे. आचारसंहिता काळात राजकीय फलक लावायचे असेल तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राजकीय फलकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 2:40 AM