पिंपरी : रुग्णाला न तपासताच प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाल्याने, कीटकनाशक औषध खरेदी करण्यास विलंब करत कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना सक्त ताकीद देत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. दोन दिवसांची रजा विनावेतन केली आहे. उपमुख्य लेखापाल विजयकुमार इंगुळकर यांना देखील सक्त ताकीद दिली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाई केली आहे.डॉ. पवन साळवे यांनी वैद्यकीय रजेकरिता पिंपळे सौदागर दवाखान्यातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडील वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय मुख्य कार्यालयात सादर केले होते. त्या पत्राचे अवलोकन केले असता त्यावर रुग्णाची स्वाक्षरी नव्हती. त्याऐवजी डॉ. साळवे यांच्या वाहनचालकाची स्वाक्षरी असल्याचे उघडकीस आले. रुग्णाला न तपासताच वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे डॉ. साळवे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. त्यावर दिलेला खुलासा सयुक्तिक नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. डॉ. साळवे यांनी पिंपळे सौदागर दवाखान्यात स्वत: हजर न राहता पदाचा गैरवापर करून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त केल्याचे समोर आले आहे.>साथीच्या आजारांवरील औषधांचा तुटवडाशहरामध्ये डेंगी, स्वाइन फ्लूसारख्या साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असताना कीटकनाशक विभागासाठी औषध खरेदी करण्यास विलंब केला. त्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची बाब स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. विभागाचे कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी उपमुख्य लेखापाल विजयकुमार इंगूळकर यांची असताना ते स्थायी समितीच्या सभेला गैरहजर राहिले. त्यामुळे दोघांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यानंतर दोघांनी खुलासा सादर केल्याने एकवेळ संधी म्हणून सक्त ताकीद दिली आहे. यापुढे कार्यालयीन कर्तव्यात कसूर केल्यास शास्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाई केली आहे.
निष्काळजीपणामुळे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, उपमुख्य लेखापाल यांच्यावर केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 1:24 AM