चिंचवड: शाळा महाविद्यालय परिसरात विना परवाना वाहन चालविणाऱ्या विद्यार्थ्यांवर आज चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली.विद्यार्थ्यांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना वाहन चालविल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलविण्यात आले.मुलांच्या हातात वाहन देताना कायद्याची माहिती घ्यावी व होणाऱ्या परिणामांची भीती विद्यार्थ्यांना असावी या साठी अधिकाऱ्यांनी पालकांची कानउघाडणी केली.शाळा महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर नियमित कारवाई करणार असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक संजीव पाटील यांनी सांगितले.
चिंचवड गावातील जैन फत्तेचंद महाविद्यालय,चापेकर चौक,जुनजकात नाका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौकात आज चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली.या वेळी विना परवाना वाहन चालविणारे विद्यार्थी व वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत हुल्लडबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.वाहने ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांच्या पालकांना वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलाविण्यात आले.पालकांना व विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली.विनापरवाना वाहन चालविल्या नंतर होणारे अपघात व घडणारे प्रसंग सांगण्यात आले.वाहतूक नियमांचे पालन करा व अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नका अथवा पुढील कारवाईस सज्ज रहा अशी ताकीद वाहतूक पोलीस उप निरीक्षक मनीषा हाबळे व पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली.या कारवाईमुळे विद्यार्थी भयभीत झाले होते.पालकांनी व विद्यार्थ्यांनी माफी मागत पुन्हा चूक करणार नसल्याचे सांगितले.
पालकांनी दक्ष राहणे महत्वाचे :पाटील
शाळा,महाविद्यालयात अनेक विद्यार्थी वाहने घेऊन येतात.अनेक विद्यार्थ्यांकडे वाहन परवाना नसतो.मुलांच्या हट्टापायी पालक त्यांना वाहने घेऊन देतात.मात्र कायद्याची भीती व घडणारे अपघाताचे प्रकार या बाबत विचार केला जात नाही.शिक्षणाच्या वयात मुलांना अपघातामुळे जायबंदी व्हावे लागते अथवा आपले प्राण गमवावे लागतात.वाहतूक नियम माहीत नसल्याने विद्यार्थी बेभान होऊन वाहने चालवितात अशा घटनेत अपघाताच्या घटना घडतात.या बाबत वाहतूक शाखेच्या वतीने शाळा व महाविद्यालयात मार्गदर्शनकेलं जाते. मात्र तरीही काही विद्यार्थी व पालक या कडे दुर्लक्ष करतात.या पूढे अशा प्रकारची कारवाई नियमित करणार असून विनापरवाना वाहन चालविणाऱ्या विद्यार्थी व पालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.या साठी पालकांनी दक्ष राहणे महत्वाचे आहे.