पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आचारसंहिता लागू झाली असली, तरी शहरातील प्रमुख चौक, रस्त्यावरील राजकीय फलक, पदाधिकाऱ्यांचे नामफलक, राजकीय पक्षांचे फलक जसेच्या तसेच गुरुवारी दिसून आले. अशा पद्धतीने राजकीय पक्ष आणि इच्छुकांकडून निवडणूक आचारसंहितेची ऐशीतैशी सुरू असल्याचे दिसून आले. अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू केली आहे. महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारीला होणार असून, पालिका क्षेत्रासाठी आचारसंहिता जारी झाली आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने नियोजन केले आहे. आचारसंहिता जारी झाली असली, तरी सर्वच प्रभागांमध्ये राजकीय फलक काढण्याची मोहीम प्रशासनाने तीव्र केलेली नाही. प्रभागांतील विविध सोसायट्या, रस्त्यावर फलक दिसून येत आहेत. राजकीय नेत्यांच्या वाहनांवरील स्टिकर, तसेच महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने, तसेच इच्छुक व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवरील मागील काचेवर लक्ष्य २०१७ असे स्टिकर लावण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर मात्र निवडणूक विभागाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. यावर कारवाई करण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. (प्रतिनिधी)
‘त्या’ फ्लेक्सवर कारवाई
By admin | Published: January 14, 2017 2:53 AM