पिंपरी : भाजीविक्रेते व मंडईबाहेरील फेरीवाल्यांमध्ये व्यवसायाच्या कारणावरून वाद झाल्याने गेल्या तीन दिवसांपासूून अधिकृत व्यापाऱ्यांनी मंडई बंद ठेवली आहे. यांवर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त व भाजी मंडई संघटनेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांनी गाळेधारकांच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांंवर शनिवारपासून कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान, जोपर्यंत अतिक्रमण काढण्यात येणार नाही. तोपर्यंत गाळेधारक भाजीविक्रेता संघटनेने बेमुदत मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत व्यवसाय करण्याच्या कारणावरून बुधवारी (दि. ९) मंडईतील अधिकृत विक्रेते व फेरीवाल्यांमध्ये वाद झाले. यांवर मंडईमधील अधिकृत गाळेधारक व्यापारी संघटनेने मंडईसमोर रस्त्यावरील बेकायदा अतिक्रमणे हटवावीत, या प्रमुख मागणीसाठी भाजीविक्रेता संघटनेने तीन दिवसांपासून बेमुदत मंडई बंद ठेवली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त राजीव जाधव व गाळेधारक भाजीविक्रेता संघटनेचे अध्यक्ष विष्णू साळवी यांच्यामध्ये गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बैठक झाली. या बैठकीला आमदार गौतम चाबुकस्वार, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते, पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अतिक्रमणावर आजपासून कारवाई
By admin | Published: March 12, 2016 12:38 AM