पिंपरी : चिखली, पिंपळे गुरव व तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली. या टोळी प्रमुखासह इतर २६ जणांवर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. या तीन टोळ्यांच्या टोळीप्रमुखासह इतर २६ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करण रतन रोकडे (वय २५, रा. चिखली) या टोळीप्रमुखासह इतर १२ यांच्याविरोधात खून, खुनाचा कट रचणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी करणे, दुखापत, विनयभंग, जबरी चोरी, शस्त्र बाळगणे यासारखे २४ गुन्हे दाखल आहेत. तसेच, सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाबा सैफन शेख (वय २९, रा. पिंपळे गुरव) या टोळीप्रमुखासह इतर आठजणांवर दुखापत करून दरोडा, गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमवून दुखापत, वाहनांची तोडफोड करून नुकसान करणे, शस्त्र बाळगणे असे दहा गुन्हे दाखल आहेत.
तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनिल जगन जाधव (वय २३, रा. वराळे, ता मावळ) या टोळीप्रमुखासह सहाजणांवर खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, दरोडा घालणे व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे सहा गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून, हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या टोळ्यांवर मोका कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपयुक्त स्वप्ना गोरे यांनी दिली.