पिंपरी : येत्या काही दिवसांत पोलिसांशी चर्चा करून बेकायदा बाईक टॅक्सीची सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करू, असे आश्वासन राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमानवार यांनी दिले. अनधिकृत बाईक टॅक्सी प्रश्नी ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतेच चिंचवड येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट येथे परिवहन आयुक्तांची भेट घेत बेकायदा बाईक टॅक्सी प्रश्नी निवेदन दिले. त्यावेळी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी दिली.
बेकायदा टॅक्सी बाईक प्रश्नी रिक्षाचालक आंदोलन करत आहेत. बेकायदा बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकांचा रोजगार बुडाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बेकायदा बाईक टॅक्सीवर अनेकदा पोलिसांकडून कारवाई करून देखील ती सुरूच आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे परिवहन आयुक्तांकडे करण्यात आली. आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये कमलेश भागनगिरे, अल्ताफ शेख, फय्याज मोमीन, सचिन वैराट व सोमनाथ म्हस्के आदींचा सहभाग होता.
...तर २८ नोव्हेंबरपासून आंदोलन
अनधिकृत बाईक टॅक्सी प्रश्नी परिवहन आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे; मात्र २८ नोव्हेंबरपर्यंत या अनधिकृत बाईक टॅक्सी बंद केल्या नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा केशव क्षीरसागर यांनी दिला आहे.