लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : कार्यालयीन वेळेनंतरही विविध विभागांत नागरिक, ठेकेदार, व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणावर राबता असल्याच्या तक्रारींची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. पावणेसहानंतर महापालिकेत शुकशुकाट झाल्यावर अधिकारी, ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक येत असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर आयुक्तांनी शिस्तीचा बडगा उगारला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू असते. महापालिकेच्या चारही मजल्यांवर गर्दी असते. कार्यालयीन कामकाजानंतर महापालिकेतील तळमजल्यावरील नगरविकास, नगररचना विभाग आणि दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम परवाना विभाग सुरू असतो. याबाबत लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. रात्रीस खेळ चाले असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर सर्वसाधारण सभेतही याचे पडसाद उमटले होते. आयुक्त राजीव जाधव यांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या होत्या. मात्र, त्यानंतर दिनेश वाघमारे यांच्या कालखंडात पहिल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. श्रावण हर्डीकर यांनी आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर पुन्हा कारवाई करण्यासाठी कार्यालयीन वेळेनंतरच्या नागरिकांच्या उपस्थितीबाबतचे महत्त्वाचे व तातडीचे परिपत्रक शाखाप्रमुख, विभागप्रमुखांसाठी जारी केले आहे. कार्यालयाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत आहे. मात्र, कार्यालयाची वेळ संपल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय बाहेरील व्यक्ती कार्यालयात उपस्थित असतात. यामध्ये ठेकेदार, आर्किटेक्ट, व्यावसायिक अशा विविध व्यक्तींचा समावेश असतो. नगररचना, बांधकाम परवानगी विभागाचे कामकाज सायंकाळी सुरू होते. अर्थपूर्ण व्यवहार तेजीत असतात.
सहानंतर ठेकेदारांना प्रवेशबंदी
By admin | Published: May 13, 2017 4:43 AM