पिंपरी : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोरोना काळातील ऑक्सीजन पुरवठा, कोवीड सेंटरला दिलेली बीले यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली होती. अतिरिक्त आयुक्त अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यावर नगरसेवकांनी आरोप केले. त्या आरोपांची दखल घेत महापौर उषा ढोरे यांनी पवार आणि रॉय या दोघांचे सर्व अधिकार तत्काळ काढून घ्याण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर चोविस तासांच्या आत आयुक्त राजेश पाटील यांनी त्यांचे अधिकार काढून घेतले आहेत. (Additional Commissioner Ajit Pawar's rights was removed, the order was given by the mayor)
पवार यांच्याकडे १७ विभागांचे कामकाज सोपविले होते. त्यांच्याकडील सर्व निविदा प्रक्रियेविषयक कामकाजाचे अधिकार काढून घेतले आहेत. त्यांच्याकडे असणारे निविदा विषयक कामकाज अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे दिले आहेत.
तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे असलेली आरोग्य, किटकनाशक, स्वच्छ भारत, महाराष्ट्र अभियान याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपविली आहे. तसेच आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वी लेखा व प्रशासन विभागाने प्रदान केलेले अधिकार त्यांच्या कार्यकक्षेपुरते वापरावेत. त्यापुढील अधिकार अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे दिले आहेत. रॉय यांनी प्रशासकीय स्वरुपाचे कामकाज करावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.