पिंपरी : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईला ‘थर्टी फर्स्ट’चे वेध लागले आहेत. ३१ डिसेंबरला मावळ आणि मुळशी परिसरातील हॉटेल व रेसॉर्टमध्ये पार्ट्या होतात. या विनापरवाना पार्ट्यांवर, जल्लोषावर पोलिस आणि अन्न आणि औषध प्रशासनाची (एफडीए) करडी नजर असणार आहे. एफडीएचे १५ अधिकारी तैनात असणार आहेत, तर ग्रामीण भागात पार्ट्यांना रात्री बारापर्यंत परवानगी असणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात हिंजवडी, रावेतसह लगतच्या परिसरात मोठ्या संख्येने आयटी क्षेत्रात काम करणारी तरुणाई राहते. सध्या सोशल मीडियावर नववर्षाच्या स्वागताच्या तयारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. तरुणाईकडून रो-हाउस, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पार्ट्यांचे नियोजन केले जात आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर, उपनगरासह लोणावळा आणि मावळ परिसरातील हॉटेल्स सजली आहेत. मोठ्या पंचतारांकित हॉटेलपासून सध्या हॉटेल्सनाही आकर्षक रोषणाई केली आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल चालकांनी डीजे, लाइव्ह गाण्यांचे शो आयोजित केले आहेत. तरुण-तरुणींना विशेष सवलत दिली जात आहे. दोन जणांसाठी दीड हजारापासून पाच हजार रुपयांपर्यंतचे प्रवेश शुल्क असणार आहे.
कुठे चालतात पार्ट्या?
हिंजवडी, लोणावळा, खंडाळा, पवना बॅकवॉटर, आंदर मावळ आणि पवनमावळ, वडिवळे धरण, कासारसाई, मुळशी धरणाच्या परिसरात रेसॉर्ट, खासगी रो-हाउस, हॉटेलमध्ये पार्ट्या होतात.
पार्टी करताय? परवानगी घेतली का?
अनेक जण नववर्षाच्या जय्यत तयारीलाही लागले आहेत. अनेकांनी हॉटेल, पब आणि रो-हाउस बुकिंगही केले आहेत, तर अनेकांनी मोकळ्या मैदानात, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक लावून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागेत पार्टी करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असून, विनापरवानगी पार्ट्या केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर
३१ डिसेंबरनिमित्त शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन केले आहे. या पार्ट्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे. फूड सेफ्टी ऑफिसरकडून हॉटेल्सची तपासणी केली जाणार असून, अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. कमी दर्जाचे, बनावट आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास त्या हॉटेल चालकांवर कारवाई केली जाणार आहे.
हॉटेल व्यावसायिकांकडून आगाऊ नोंदणी
हॉटेलमध्ये कॉलेजचे विद्यार्थी, आयटीमध्ये काम करणाऱ्या तरुण-तरुणी फोन करून विविध ऑफर्सची माहिती घेत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्सनी मेन्यूवर सवलती व विशेष पॅकेजची व्यवस्था केली आहे.
पुणे जिल्ह्यात एफडीएचे १५ अधिकारी असून, हॉटेलची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. कमी दर्जाचे आणि असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. - सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन
पवनानगर भागात दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या पार्श्वभूमीवर हॉटेल, टेंन्ट मालकांची नुकतीच बैठक घेऊन त्यांना ३१ डिसेंबरला जादा कर्मचारी नेमण्याचे, क्षमतेपेक्षा जादा नागरिकांना प्रवेश न देण्याचे आदेश दिले आहेत, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे येणाऱ्या प्रत्येकाचे आधार कार्ड क्रमांक, गाडी क्रमांक यांची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. - किशोर धुमाळ, पोलिस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण.