पिंपरी : मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. अनंत चतुर्दशीला सर्वच गणेश मंडळांच्या वतीने भव्य मिरवणुका काडून गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आतापासूनच सज्ज झाली आहे.सुमारे १२०० पोलीस कर्मचारी विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. पवना नदीकाठी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेने सुरक्षारक्षक, सफाई कार्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान असे सुमारे ४५० कर्मचारी व वाहने अशी यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. एक पोलीस उपायुक्त ४ सहायक पोलीस आयुक्त, ११ पोलीस निरीक्षक, ५१ सहायक निरीक्षक आणि ४४६ पोलीस कर्मचारी उपलब्ध राहाणार आहेत. गर्दीची ठिकाणे, घाट अशा १८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. १३ ठिकाणी वॉच टॉवर असतील. अशा स्वरूपात पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचे पाऊल उचलून आतापर्यंत ११ तडीपार गुंडांवर कारवाई केली आहे. तडीपार गुंड परिसरात दिसल्यास कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.पालिकेचे ४१ सुरक्षारक्षक, अग्निशामकचे १२ जवानविसर्जन घाटावर असणार आहेत़ सुरक्षेच्या दृष्टीने ह्या उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. चिंचवड विसर्जन घाटावर २६ सुरक्षारक्षक, पिंपरी घाटावर १५, अग्निशामकचे ४ कर्मचारी, फाईट गार्ड ८ अशी यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. गणेश तलाव (प्राधिकरण), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), रिव्हर रस्ता (पिंपरी), पिंपळे सौदागर, काळेवाडी आणि वाकड या ठिकाणी विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जनाची व्यवस्था आहे. महापालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणाही सजग ठेवण्यात आली आहे.विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी ७ वाजता चिंचवड स्टेशन ते चिंचवडगाव, पिंपरी ते कराची चौक, कराची चौक ते रिव्हर रस्ता, गांधीपेठ ते चापेकर चौक, मोरया हॉस्पिटल ते चापेकर चौक हे मार्ग अन्य वाहनांसाठी बंद राहतील. या मार्गावर केवळ विसर्जन मिरवणुकीची वाहने असतील.तातडीक मदतीसाठी संपर्कआपत्कालीन वैद्यकीय सेवा : ६७३३२१०१रुग्णवाहिका : २७४२१०६४अग्निशामक केंद्र : २७४२३३३३तालेरा रुग्णालय : २७६१३८३१‘फ’ क्षेत्रीय कार्यालय : २७६५०३२४‘ड’ क्षेत्रीय कार्यालय : ९८२२०१२६८७‘ग’ क्षेत्रीय कार्यालय : २७१४२५०३
पालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा सज्जे; आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ४५० कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 6:05 AM