पिंपरी : तळवडे येथील फटाका कारखान्यातील स्फोटाने प्रशासकीय यंत्रणेच्या चिंधड्या उडाल्याचे दिसून आले. शुक्रवारी झालेल्या या दुर्घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहर हादरले. यापूर्वी चिखलीतील पूर्णानगर येथे ३० ऑगस्ट रोजी आगीच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर अनधिकृत कारखाने, आस्थापना यांची पाहणी करून कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात एमआयडीसीमध्ये लहानमोठे हजारो उद्योग आहेत. यासह काही उद्योग नाेंद नसलेले आहेत. अशा उद्योगांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतलेली नसते. आग प्रतिबंधक यंत्रणा नसते. वायुविजनाची पुरेशी व्यवस्था नसते. त्यामुळे दुर्घटना झाल्यास मोठ्या नुकसानीसह जीवितहानी देखील होते. दुर्घटना घडल्यानंतर संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. अनधिकृत कारखाने, धोकादायक कारखाने यांची पाहणी करून उपाययोजना करण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाकडून जाहीर केले जाते.
अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी भेटदुर्घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वायसीएम रुग्णालयात जखमींची विचारपूसदेखील केली.