पिंपरी : रेशन दुकानात ग्राहकांची स्वाक्षरी घेण्यात येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका आहे. प्रशासनाच्या सावळ्या गोंधळामुळे असा अनागोंदी कारभार सुरू आहे. स्वाक्षरी ऐवजी धान्य घेणाºया ग्राहकांचा आधार कार्ड किंवा ओळखपत्र क्रमांक घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉप किपर फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत निवेदन दिले आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण प्रधान सचिवांनी १५ एप्रिल २०२० रोजी परिपत्रक काढून वितरण कार्यपद्धती कशाप्रकारे केली जावी, याच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. परंतु रेशन दुकानात धान्य घेणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी नोंदवहीत घेण्यात यावी यावरून दुकानदारांमध्येही संभ्रम निर्माण होत आहे. दुकानदारांनी प्रधान सचिवांच्या परिपत्रकाचे पालन करायचे की, वितरण विभागाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करायचे, याबाबत गोंधळ आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी धान्य घेणाऱ्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा किंवा स्वाक्षरी न घेता आपण त्याचा आधार क्रमांक किंवा त्या घरातील सदस्याचा आधार क्रमांक द्यावा व शिधापत्रिकेच्या शेवटच्या पृष्ठावर महिन्याचे धान्य मिळाले, असा शिक्का मारावा, असे स्पष्टपणे सूचित केले आहे. तरीपण अशाप्रकारे जर वितरण विभाग सूचना माध्यमांद्वारे देत असेल तर दुकानदारांनी कोणाच्या सूचनांचे पालन करावे, याबाबत गोंधळ आहे. याबाबत सुसूत्रता आणून अनागोंदी कारभार थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पिंपरी परिसरात रेशन वितरणाबाबत प्रशासनाचा सावळा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 4:40 PM
रेशन दुकानात धान्य घेणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी नोंदवहीत घेण्यात यावी यावरून दुकानदारांमध्येही संभ्रम
ठळक मुद्दे माजी खासदार गजानन बाबर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत निवेदन