मिलिंद कांबळे, पिंपरीताशी १४० ते १५० किलोमीटर असा वेगाशी सामना करणारी दुचाकी. त्यावर स्वार असलेला ३० वर्षांचा विनिल खारगे हा साहसी तरुण. भारतीय रस्त्यावर सुसाट वेग कायम ठेवत तब्बल २ हजार १३७ किलोमीटर अंतर त्याने कापले केवळ २४ तासांमध्ये. पुणे ते चेन्नईतील वेलोरे आणि पुन्हा पुणे असा तुफानी वेगवान दुचाकी प्रवास अविश्वनीय आणि आश्चर्यचकित करणारा असाच आहे. कमी कालावधीत सर्वांधिक अंतर दुचाकीवरुन कापण्याचा हा राष्ट्रीय नवा विक्रम आहे. यापूर्वी त्याने दुचाकीवरुन ३६ तासांमध्ये २ हजार ५०० किलोमीटर कापण्याचा विक्रम नोंदविला गेला आहे. उद्योगनगर, चिंचवडमधील विनिल संगणक कंपनीत कामास असून बसने ये- जा करतो. त्याच्याकडे दुचाकी नाही हे एक आश्चर्य आहे. मात्र, तुफान वेगात दुचाकी चालविण्याचे कौशल्य आणि चपळाई त्याच्याकडे नेत्रदिपक आहे. मामाच्या मुलाची दुचाकी वापरत त्याने हा विक्रम नोंदविला आहे. शुक्रवारी (दि. ३० जानेवारी) दुपारी ३ ला त्याने ताथवडे, चिंचवड येथून दुचाकीस ‘स्टार्ट’ केली. कर्नाटक, हुबळी, बंगलुर यामार्गे चेन्नईतील वेलोरे येथे पोहचला. हे १ हजार ६८ किलोमीटरचे अर्धे अंतर त्याने पार केले. तेथे तो शुक्रवारी रात्री ३.२५ ला पोहचला. तेथून पुन्हा पुण्याचा दिशेने प्रवास सुरू झाला. पुन्हा याच मार्गाने दुचाकी सुसाट पळवित तो शनिवारी (दि. ३१ जानेवारी) दुपारी २ वाजून ५३ मिनिटाने पुण्यात पोहचला. त्यानंतर १५ मिनिटाने म्हणजे ३ वाजून ८ मिनिटास चिंचवडच्या प्रारंभस्थळावर होता. हुबळीत अद्याप एक पदरी मार्ग असल्याने थोडा त्रास जाणवला. बंगलुरला शुक्रवारी रात्री ११.३० पर्यत गाठण्याचे लक्ष्य होते. मात्र, तेथे १२.४५ ला पोहचल्याने विक्रमाची कालावधी गाठणे अशक्य असल्याची भिती निर्माण झाली होती. मात्र, पुढील टप्प्यात तो वेळ आणि अंतर वायू वेगात कापले. असाच प्रसंग परतीच्या मार्गावर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर होता.
चिंचवडमधील तरुणाचा साहसी विक्रम
By admin | Published: February 02, 2015 2:16 AM