रावेत : शहरात झाडांना खिळे ठोकून फुकटात जाहिराती करून झाडांना इजा पोहचविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असा आदेश महापालिकेच्या उद्यान विभागाला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला होता. या आदेशाला केराची टोपली दाखवीत काही व्यावसायिकांकडून शहरातील झाडांवर खिळे ठोकून जाहिरातबाजी करणाºयांचे प्रमाण वाढत आहे.आकुर्डी रेल्वे स्टेशन मार्गालगत असणाºया पिंपरी-चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेज रोडवर हे अभियान राबवण्यात आले. या वेळी हे चित्र पहावयास मिळाले. एका झाडावर चक्क सहा जाहिराती ठोकून झाडाचा श्वास गुदमरत आहे. कॉलेज रोड असल्यामुळे येथे एका एका झाडावर खासगी क्लासच्या जाहिरातींचे ५ ते ६ बोर्ड लावण्यात आले आहेत.अंघोळीची गोळी आणि इतर सामाजिक संस्थांमार्फत ‘खिळेमुक्त झाडे’ हे अभियान चार महिन्यांपासून राबविण्यात येत आहे. शहरातील सर्वच स्तरातून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.कारवाई न झाल्यास आयुक्तांना देणार खिळेअंघोळीची गोळी संस्थेतर्फे आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे, ‘‘स्मार्ट सिटी आणि स्वच्छ शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असताना झाडांवरील जाहिरातींकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेत उद्यान आणि आकाशचिन्ह विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने कारवाई होत नाही. फ्लेक्स, बॅनर आणि खासगी क्लासच्या जाहिरातींमुळे शहर बकाल होत आहे. मागील महिन्यात खिळेमुक्त अभियानाचे शिष्टमंडळ आयुक्त हर्डीकर यांना भेटले होते. झाडांवर खिळे ठोकून जाहिरात करणाºयांवर कारवाईचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. परंतु आजतागायत किरकोळ स्वरूपाची निगडी प्राधिकारणातील जाहिरातदारांवर केलेली कारवाई सोडली तर एकही मोठ्या स्वरूपाची दंडात्मक कारवाई झाली नाही. झाडांवर जाहिराती लावून विद्रूपीकरण आणि झाडांना इजा पोहचविणाºयावर महापालिकेने दंडात्मक कारवाई न केल्यास मागील महिन्यात झाडांमधून काढलेले सुमारे दहा हजार खिळे आयुक्तांना भेट म्हणून देण्यात येतील’’काही झाडांवर अजूनही फ्लेक्स, बॅनर आणि खासगी क्लासच्या जाहिरातींमुळे झाडांची घुसमट करण्यात येत आहे. अशा जाहिरातदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करून संस्थेतर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनही दिले आहे. संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी उद्यान विभागाला दिले होते. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्याकडे उद्यान विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे फुकट्या जाहिरातदारांचे फावले आहे. उद्यान विभागाकडून संबंधितांवर कारवाई होत नसल्याने गेल्या महिन्यात काढलेले सुमारे दहा हजार खिळे आयुक्तांना भेट देण्याचा इशारा देण्यात आला आहे.अंघोळीची गोळी संस्थेचे अध्यक्ष माधव धनवे व ज्येष्ठ नागरिक महासंघाचे आनंद पानसे यांनी या संदर्भात महापालिका आयुक्त हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर, राजेश बाबर, संदीप सकपाळ, संदीप रंगोले, प्राजक्ता रुद्रावर, अन्वर मुलाणी, राहुल धनवे, संदीप वाल्हेकर, हरीष टकले, उल्हास टकले उपस्थित होते.जाहिरातबाजांवर दंडात्मक कारवाई अपेक्षित आहे. अन्यथा झाडांवरून काढण्यात आलेले १० हजार खिळे महापालिकेच्या प्रशासकीय भवनात टाकण्यात येतील. आयुक्तांना हे खिळे भेट म्हणून देण्यात येतील. अनोखे आंदोलन करण्यात येईल, असे आनंद पानसे म्हणाले.
फुकट्यांची झाडांवरील जाहिरातबाजी सुरूच, आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 1:50 AM