पिंपरी : वाहनचोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. २०२० या वर्षभरात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ८६१ दुचाकी चोरीला गेल्या. त्यातील १८८ दुचाकींचा शोध लागला तर ६७३ गाड्या गेल्या कुठे, तसेच चोरीच्या गाड्यांचे काय होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातून वाहनचोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांनी पथके नियुक्त केली होती. त्यानुसार आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा टोळीचा पदार्फाश देखील करण्यात आला. मात्र तरीही वाहनचोरीचे सत्र थांबलेले नाही. घराच्या पार्किंगमधून वाहनांची चोरी होत आहे. त्यात दुचाकींची संख्या जास्त आहे. त्यामुळे दुचाकीचालक धास्तावले आहेत.
लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर वाहनचोरीचे प्रकार वाढले. तसेच मौजमजेसाठी देखील वाहने चोरी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दुचाकी चोरल्यानंतर तिच्यावरून मनसोक्त फिरायचे व मौजमजा करायची. त्यातील पेट्रोल संपले की तेथेच दुचाकी सोडून द्यायची, असे प्रकारही काही चोरट्यांनी केले. यात वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच बहुतांश प्रकरणांत वाहने परत मिळत नाहीत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
काही मिनिटांतच गाडी होते स्क्रॅपदुचाकी चोरी करून तिचे पार्ट काढले जातात. त्यातील महागडे पार्ट छुप्या मागार्ने चोर बाजारात किंवा परराज्यात जातात. तसेच इतर पार्ट स्क्रॅप केले जातात. गाडी जुनी असेल तर ती पूर्णत: स्क्रॅप केली जाते. शहरातील काही भागात हे सर्व काम काही मिनिटांत केले जाते. त्यामुळे चोरीच्या वाहनांचा मागमूसही लागत नाही. काही वाहनांची विक्री होते. त्यातील काही वाहनांचाच शोध पोलीस घेऊ शकले आहेत.
..............
चोरट्यांच्या टोळ्या सक्रीयवाहनचोरट्यांच्या टोळ्या शहरात सक्रीय आहेत. यातील काही टोळ्यांचा पदार्फाश करून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २०२० मध्ये २५८ दुचाकीचोरांना अटक केली. विधी संघर्षित बालकांचाही वाहनचोरीच्या गुन्ह्यांंमध्ये समावेश असल्याचे दिसून येते.
...............
वाहनाधारकांनी वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क केली पाहिजेत. घर तसेच सोसायटीच्या पार्किंगमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शक्य झाल्यास आवश्यकतेनुसार सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत. दुचाकी व इतर वाहनांना योग्य प्रकारचे अलार्म व सेफ्टी लॉक लावले पाहिजेत. जेणे करून वाहनचोरीच्या प्रकारांना आळा घालता येईल.- सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड