मुंबई - राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. महाविकास आघाडीतील काटे-कलाटे मत विभागणीचा फायदा भाजपला झाला अन् भाजपच्या आश्विनी जगताप या तब्बल ३६ हजार १६८ मतांधिक्याने विजयी झाल्या. आता, या जय-पराजयावरुन राजकरण रंगत आहे. येथील पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांना टोला लगावलाय.
पिंपरीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मते मिळाली. त्यामुळेच, भाजप उमेदवाराच लविजय सोपा झाला, जर राहुल कलाटेंना उमेदवारी दिली असती तर येथेही महाविकास आघाडीला विजय मिळवणे शक्य झालं असतं, असा सूर आता निघत आहे. चिंचवड मतदारसंघात राहुल कलाटेंना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळेच प्रकाश आंबेडकर हे कलाटेंच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. पण, अजित पवारांनी नाना काटेंना उमेदवारी देऊ केली. राष्ट्रवादीनेच राहुल कलाटेंच्या उमेदवारीला विरोध केल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. राहुल कलाटेला तुम्ही घ्या अन् निवडणूक लढवा ही भूमिकाही आम्ही घेतली होती. पण, हेकेखोरपणा तिथं असताना चालत नाही, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी अजित पवारांना लक्ष्य केलंय.
पराभवानंतर काय म्हणाले अजित पवार
वंचित आघाडीचे अध्यक्ष आणि तिथल्या सगळ्या टीमने राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना हे पाठिंबा दिल्याचं आवडलं नाही, पण, प्रत्येकजण काही ना काही मतं खेचू शकतो, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचा पिंपरी चिंचवडमध्ये म्हणावा तेवढा परिणाम झाला नसल्याचे अजित पवार यांनी चिंचवडमधील निकालानंतर म्हटले होते. त्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांना लक्ष्य केलंय.
आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक म्हणून ओळख
चिंचवड विधानसभा मतदार संघातील माजी शिवसेना गटनेते राहुल तानाजी कलाटे आहेत. त्यांचे दिवंगत वडील तानाजी कलाटे हे जिल्हा परिषद सदस्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक होते. तसेच त्यांची आई कमल कलाटे याही २००७ ते २०१२ या कालखंडात महापालिकेत नगरसेविका होत्या. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सुरूवातीला आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. पुढे जगताप यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.