पिंपरी : रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था वाढविणे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप महापौरांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला. डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचा निषेध आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करण्यात यावेत, यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जात सहा दिवसांपासून संप पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरही गुरुवारपासून सामूहिक रजेवर गेले होते. दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत डॉक्टर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्ण तपासणीसाठी उशीर होत होता. बाह्यरुग्ण विभागात काही काळ रुग्णांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.डॉक्टरांनी घेतलेल्या सामूहिक रजेची प्रशासनाने गंभीर दखल घेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत डॉ. रॉय यांनी डॉक्टरांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देत कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. मात्र हे आश्वासन लेखी स्वरूपात दिले, तरच संप मागे घेतला जाईल, असा पवित्रा घेत रजेवर राहण्याचा निर्णय या डॉक्टरांनी घेतला आहे.मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मार्डच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक होणार होती. ही बैठक पार पडल्यानंतरच संप कायम ठेवायचा, की मागे घ्यायचा याचा निर्णय होणार होता. दुपारी मुख्यमंत्र्यांनी संपावर असणाऱ्या डॉक्टरांना सज्जड दम दिला. जनतेच्या पैशांवरच सरकारी डॉक्टरांचे शिक्षण सुरू असते. त्या जनतेलाच वेठीस धरून त्यांना मरणाच्या दारात सोडणार असाल, तर हे खपवून घेणार नाही. देवाचा दर्जा दिलाय, दानव बनू नका, असे सांगत कामावर रुजू होण्यास सांगितले. तसेच मार्डने देखील उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत संप मागे घेत शनिवारी कामावर रुजू होण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
शिष्टाईनंतर संप मागे
By admin | Published: March 25, 2017 3:49 AM