हणमंत पाटील
पिंपरी: कोरोनाच्या संकटात मुले आई-वडिलांना स्वीकारत नाहीत. आधाराची गरज असताना अनेक जवळचे मित्र व नातेवाईक दूर जातात. मदत करावी लागेल म्हणून बोलणेही टाळतात. अशा नकारात्मक गोष्टी समोर येत असतानाही पुणे व पिंपरी-चिंचवड येथील नाहर कुटुंबातील राम-लक्ष्मणाची जोडी याच कोरोनाच्या संकटात तब्बल एक तपानंतर एकत्र आल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.
पुण्यातील बिबवेवाडी येथे नाहर कुटुंबातील २३ सदस्य एकत्र राहतात. कुटुंबातील चार बहीण-भावंडे एकत्र लहानाचे मोठी झाली. त्यापैकी संजय नाहर हे उद्योग व्यावसायानिमित्ताने भोसरी येथे स्थलांतरित झाले. त्यांनी आपल्या लाडक्या भावाला म्हणजे राजेश यांनाही तिकडे येण्याचा आग्रह केला. राजेश यांना चाकण भागात कंपनी सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. दोन्ही भाऊ अनेक वर्ष एकत्र असल्याने त्यांना ‘राम-लक्ष्मणा’ची जोडी म्हणून समाजात ओळखले जात होते. मात्र मुले मोठी झाल्यानंतर राजेश यांनी त्यांच्या शिक्षणासाठी पुन्हा पुण्यात परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाऊ आपल्यापासून दूर जात असल्याने संजय नाहर नाराज झाले. त्यानंतर दोघांमध्ये गैरसमज वाढत गेले. त्यामुळे एकमेकांशी बोलणे, भेटणे आणि काैटुंबिक सण-समारंभालाही एकत्र येणे बंद झाले. त्यानंतर संजय यांनीही पुण्यातील आई व इतर भावंडाकडे जाणे पूर्ण बंद केले.
दरम्यान, कुटुंबापासून एकाकी असलेल्या संजय यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गाठले. या काळात पुन्हा कुटुंबाची तीव्रतेने त्यांना आठवण येऊ लागली. आतापर्यंतचा सर्व प्रवास आठवू लागला. त्यामध्ये आपल्या काही चुकांमुळे आपल्या रक्ताचे नाते कसे दुरावले. आपण या संकटातून वाचू शकलो, नाही तर आपल्याला भगवान महावीर माफ करणार नाहीत. अशी तीव्र जाणीव महावीर जयंती दिवशी हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना झाली. अन् घडलेही तसेच, तब्बल १२ वर्षे दुरावलेला त्याचा भाऊ राजेश कोणतीही कल्पना नसताना त्यांना आधार देण्यासाठी मुलांसह थेट हॉस्पिटलमध्ये सेवेसाठी आला. त्यावेळी संजय यांनाही आनंदाश्रू लपवता आले नाहीत. त्यानंतर ते बंधूंच्या मोबाईलवरून आईशी बोलले.
नात्याचा आधार प्राणवायूसारखा...
जीवन-मरणाच्या दारात असताना रक्ताच्या नात्याकडून मिळालेला मानसिक आधार त्यांना ‘प्राणवायू’सारखा महत्त्वाचा वाटला. त्यामुळे संजय यांनी लवकर कोरोनाच्या संकटावर मात केली. कोरोनाच्या संकटाने आम्हाला पुन्हा एकत्र आणल्याची भावना नाहर कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
कोरोनातून बरा झाल्यानंतर सर्वांची माफी मागून कुटुंबात पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. माझ्या बंधूने कात्रज येथे बांधलेल्या माता मंदिरात एकत्र भेटण्याचा आम्ही निर्णय घेतला. केवळ भावाने बांधलेले मंदिर म्हणून मी त्या मंदिरात एकदाही गेलो नव्हतो. तेथे आम्ही एकत्र आलो. आता कायम एकत्र राहणार आहे. असे उद्योजक संजय नाहर यांनी सांगितले.
आमचे पूर्वीपासून एकमेकांवर घट्ट प्रेम होते. मात्र, मी पुण्यात गेल्याने काही गैरसमज निर्माण झाले होते. कोरोनाच्या संकटात पुन्हा आम्ही एकमेकांच्या मदतीला धावून गेलो. संकटकाळात रक्ताचे नातेच एकमेकांच्या मदतीला येई शकते, हे सिद्ध झाले. आम्ही दोघे एकत्र आल्याने आनंदाने आमच्या ७५ वर्षांच्या आईचे आयुष्य आणखी वाढेल. तसेच देशभरातील पाच हजार नाहर बांधवाना एकत्र आणताना आपल्या सोबत आपलाच भाऊ नसल्याची माझ्या मनातील खंतही या भेटीने संपली. राजेश नाहर, अध्यक्ष, ऑल इंडिया नाहर परिवार, पुणे