पिंपरी : शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनी १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यानंतर तीन दिवस सापळा रचून सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून १० लाखांचे सोने आणि दोन लाख ६० हजारांच्या दुचाकी असा १२ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. खंडणी विरोधी पथक आणि चिंचवड पोलिसांच्या सयुंक्त पथकाने ही कामगिरी केली.
प्रभाकर येमनप्पा दोडमणी (वय २६, रा. आनंदनगर, चिंचवड), अल्ताफ सलीम शेख (वय १९, रा. हांडेवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला होता. या पार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी त्यांचे तीन आणि चिंचवडचे एक असे चार पथक तयार केले. सोनसाखळी चोरीच्या घटनांचा चारही पथकांकडून आढावा घेण्यात आला. त्यावेळी १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. त्यावरून आरोपींच्या येण्या जाण्याच्या मार्गांचा आढावा घेऊन तीन दिवस सापळा रचला. दरम्यान पोलीस नाईक आशिष बोटके आणि स्वप्नील शेलार यांना माहिती मिळाली की, आरोपी आकुर्डी, निगडी, चिंचवड, पिंपरी परिसरात फिरत आहेत. त्यानुसार पोलीसांनी आरोपींना चिंचवड येथून ताब्यात घेतले. चिंचवड येथे दूध खरेदीसाठी आलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली आरोपींनी दिली. शहरात एकूण १५ ठिकाणी सोनसाखळी हिसकावून चोरी आणि पाच दुचाकी चोरल्याची कबुली आरोपींनी दिली.
आरोपी प्रभाकर दोडमनी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे शहर, पुणे रेल्वे, कर्नाटक आदी ठिकाणी जबरी चोरी, वाहन चोरी, असे एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.