पिंपरी : मुंबई- बंगळूर महामार्गावरील चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर वाकड येथून आठ तासांत वाहतूक खुली करण्यात आली. वाकड येथून रविवारी सकाळी साडेआठपासून चांदणी चौकाकडे वाहने टप्प्याटप्प्याने सोडण्यात आली. त्यानंतर एका तासात येथील वाहतूक सुरळीत झाली. शनिवारी रात्री अकरापासून वाहतूक वळविण्यात आली होती. त्यामुळे निपचित पडलेला हा महामार्ग दहा तासांनंतर रविवारी सकाळी नऊपासून पुन्हा धावला.
चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले होते. मुंबई-पुणे द्रुतर्गती मार्गावरील उर्से टोलनाका ते मुंबई -बेंगळूर महामार्गावरील चांदणी चौक या दरम्यान ठिकठिकाणी बॅरिकेडस लावून वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली होती. त्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त डाॅ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक बदल करून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी १२ ते १४ तास रस्त्यावर थांबून वाहतूक नियमन केले.
कळंबोली, खालापूरला थांबवली अवजड वाहने
चांदणी चौकाकडे जाणारी वाहने पुणे-मुंबई महामार्ग तसेच द्रुतगती मार्गावर कळंबोली येथे तसेच खोपोली टोलनाका व ट्रक टर्मिनल येथे थांबविण्यात आली. त्यामुळे उर्से टोलनाक्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या कमी झाली. उर्से टोलनाका येथे देखील वाहने पर्यायी मार्गावर नियोजनबद्धपणे सोडली. त्यामुळे या मार्गांवरही वाहतूक कोंडी झाली नाही.
पाच रुग्णवाहिकांसाठी दिला रस्ता
मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर उर्से टोल नाका येथे रात्री एक ते तीन या कालावधीत वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा लागल्या होत्या. यातील प्रवासी वाहनांना प्राधान्य देत तत्काळ पर्यायी मार्गांवर सोडण्यात आले. तसेच यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या पाच रुग्णवाहिकांना देखील पोलिसांनी रस्ता करून दिला. त्यामुळे रुग्णवाहिकांमधील रुग्णांना दिलासा मिळाला.
टप्प्याटप्प्याने सोडली वाहने
पूल पाडल्यानंतर रविवारी सकाळी उर्से टोल नाका, वाकड, राधा चौक येथून सकाळी साडेआठपासून वाहने टप्प्याटप्प्याने सोडली. वाहने एकदम सोडली तर रस्त्यावर वर्दळ वाढून कोंडी होण्याची शक्यता होती. त्यामुळे १० ते १५ मिनिटांचा टप्पा करून पोलिसांनी वाहने सोडली. तासाभरात म्हणजे सकाळी साडेनऊपर्यं ही वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर महामार्ग सर्व वाहनांसाठी खुला केला.