पिंपरी: गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कंत्राटी कामगारांची पिळवणूक सुरू आहे. परंतु आता सफाई महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावे यासाठी व त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले.
कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने सोमवारी सायंकाळी आंदोलन करून निवेदन देण्यात आले. पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्याध्यक्ष बळीराम काकडे , भीमा-कोरेगाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिता साळवे, प्रल्हाद कांबळे, सविता लोंढे , मंगल तायडे , मधुरा डांगे, कांताबाई कांबळे , आशा पठारे आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले, '' महानगरपालिकेत गेले वीस वर्षापासून आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या महिलांना नियमानुसार महानगरपालिकेने कायमच सेवेत घेतले पाहिजे. परंतु तसे न करता गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या वतीने कंत्राटी कामगारांची पिळवणूक सुरू असून त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेतले जात नाही , यापूर्वी देण्यात आलेले ठेके आता संपत आले असून पुन्हा त्याच ठेकेदारांना आणि इतर ठेकेदारांनसाठी पुन्हा निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु ही निविदा रद्द करून कर्मचाऱ्यांना कायम करावे." ..........
आंदोलन कर्त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सोळाशे साफ सफाई कामगार महिलांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता, शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केले आहे. कोरोना आपत्ती काळात सेवा दिल्याबद्दल कायम कामगारांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने भरघोष आर्थिक मदत दिली. मात्र, कंत्राटी पद्धतीने कामे करणाऱ्या साफसफाई कामगार महिलांना मात्र, दीड हजार रुपये मदत करण्याचे जाहीर केले आहे, हि मदत अत्यंत तुटपुंजी आहे, किमान पाच हजार रुपये आर्थिक मदत करावी,दिवाळीनिमित्त पगार एवढा बोनस देण्यात यावा, साफसफाई कामगार महिलांचा थकीत प्राव्हिडन्ट फंड तातडीने देण्यात यावा, समान काम समान दाम या पद्धतीने आणि सरकारने ठरवून दिले प्रमाणे किमान वेतनाचा फरक मिळवून द्यावा, गेली अनेक वर्षांपासून साफसफाई कामगार महिला महानगरपालिकेत कामे करत आहेत, त्यांचे सेवेतील योगदान लक्षात घेता त्यांना कायमस्वरूपी महानगरपालिका सेवेत सामावून घ्यावे, घरकुल योजनेत साफसफाई कामगार महिलांना प्रधान्य देण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.