लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला-क्रीडा मंच पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी भोसरीत एकदिवसीय राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलन होणार आहे, संमेलनात विविध अहिराणी भाषा विषयक परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली. या वेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. पिंगळे, स्वागताध्यक्ष नामदेव ढाके, मंचाच्या अध्यक्षा विजया मानमोडे, साहित्यिक बापूसाहेब पिंगळे आदी उपस्थित होते. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात रविवारी सकाळी अकराला सांस्कृतिक मंत्री शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी होणार आहे. त्यानंतर नऊला ग्रंथदिंडी, साडेदहा वाजता निकिता बागुल गणेश वंदना सादर करणार आहेत. कस्तुरी ग्रुप-गौराई कानबाईना गाना, भिलाऊ नृत्य सादर करतील. अकराला उद्घाटन होईल.दुपारी एकला अहिराणी भाषा आणि साहित्यापुढील आव्हान या विषयावर परिसंवाद, दोन वाजता कथाकथन, तीनला निमंत्रित कवींचे संमेलन, चारला बहुभाषिक कविसंमेलन, सायंकाळी पोऱ्या ते पोऱ्या बापरे बाप हे अहिराणी नाटक सादर करणार आहेत. सायंकाळी सहाला पारंपरिक खान्देश लोकगीत- संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम होईल. विश्राम बिरारी हे त्याचे सादरीकरण करतील. अहिराणी कस्तुरी म्युझियम ग्रुपच्या कार्यक्रमाने समारोप होईल.
अहिराणी साहित्य संमेलन रविवारी
By admin | Published: May 25, 2017 2:59 AM