अखेर तिढा सुटला... पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 12:00 PM2022-02-12T12:00:30+5:302022-02-12T12:05:35+5:30
याबाबत आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तातडीने बैठक घेतली आणि नवीन कार्यकारणी जाहीर केली
पिंपरी : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर गेल्या चार महिन्यापासून प्रलंबित असणारा शहर अध्यक्ष निवडीचा तिढा सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे यांची निवड झाली आहे. विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या शहराध्यक्षपदाच्या तीन वर्षांच्या दोन टर्म पूर्ण झाल्याने नवीन कार्यकारणी नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी होत होती. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष निवडीवरून राजकारण सुरू होते. वाईट काळात साथ दिल्याने संजोग वाघेरे यांनाच पदावर ठेवावे अशी मागणी एका गटाने केली होती. त्यामुळे चार महिने या पदास खोडा बसला होता. याबाबत लोकमतने आज 'पक्षातील राजकारणमुळे ठरेना शहराध्यक्ष' असे वृत्त प्रसिद्ध केले होते.
याबाबत आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तातडीने बैठक घेतली आणि नवीन कार्यकारणी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन चेहऱ्यांना संधी देत शहराध्यक्षपदी माजी स्थायी समिती अध्यक्ष व विद्यमान युवा नगरसेवक अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष पदासाठी माजी आमदार सुरेश गोरे यांची भगिनी कविता अल्लाट व युवक अध्यक्षपदासाठी पानसरे गटाचे इमरान पानसरे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडे सुपूर्द केले.
तीन कार्याध्यक्ष
शहराध्यक्षासोबत तिन्ही विधानसभेसाठी स्वतंत्र कार्याध्यक्ष म्हणून भोसरी विधानसभेसाठी राहुल भोसले, पिंपरी विधानसभेसाठी जगदीश शेट्टी व चिंचवड विधानसभेसाठी प्रशांत शितोळे यांची निवड करण्यात आली आहे.