पिंपरी : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळात सर्वांत मोठा घोटाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंचन घोटाळ्यातील आरोपी अजित पवार आणि इतर आरोपींच्या दारात कोणत्याही क्षणी पोलीस जातील. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला.
निगडीतील भारतीय जनता पार्टीच्या अटल संकल्प संमेलनात ते बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकाँग्रेसच्या कालखंडातील सिंचन घोटाळ्यावर दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली. दानवे म्हणाले, ‘‘जाती भेदाचे आणि बुद्धीभेदाचे राजकारण केले जात आहे. भाजपाच्या विरोधात सर्वजण एकत्र आले आहेत. सिंचन घोटाळ्यात दोषी असणाऱ्या अजित पवार यांच्या दारावर कोणत्याही क्षणी पोलीस धडकून अटक केली जाऊ शकते.’’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘सिंचनाच्या नावावर स्वतची तिजोरी आघाडी सरकारच्या नेत्यांनी भरली. आम्ही रस्ते, सिंचनाचे काम केले मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडी सरकारने सिंचनाचे घोटाळे केले. चाळीस टक्के अधिक दराने निविदा काढल्या होत्या. आम्ही सिंचनाच्या निविदा काढल्या एकही निविदा वाढीव नाही.’’