पिंपरी : कसबा आणि चिंचवड दोन जागा होत्या. मी चर्चा केली, मार्ग निघावा हा हेतू होता. त्यासाठी मी शेवटपर्यंत चर्चा केली. वेगवेगळे पर्याय दिले पण एकमत झाले नाही. सकाळी सर्वांशी बोललो. त्यानंतर नाना काटे यांच्या नावावर एकमत झाले. ते जाहीर करून अर्ज दाखल केला असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ते बोलत होते. अर्ज दाखल करण्यासाठी पिंपळे सौदागर येथून थेरगावमधील ग क्षेत्रीय कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ यावेळी घोषणा देण्यात आल्या. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट आदि उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, " पोटनिवडणुकीत चिंचवड जागेसाठी आणि उमेदवार कोण यासाठी मी शेवटपर्यंत चर्चा केली. वेगवेगळे पर्याय दिले पण एकमत झाले नाही. सकाळी सर्वांशी बोललो. त्यानंतर नाना काटे यांच्या नावावर एकमत झाले. ते जाहीर केले. राहुल कलाटे उभे राहणार असले तरी आमचा अजूनही एकमत करण्याचा प्रयत्न आहे. सहानुभूतीचा विषय नाही. तीन निवडणुकामध्ये यांना सहानुभूती दिसली नाही. फक्त मुंबईमध्ये त्यांनी उमेदवार दिला नाही. त्यामुळे ही निवडणूक लढवावी हे सर्वांचे मत होते. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा पाठिंबा राहील असे सांगितले आहे. या शहराशी माझा संबंध आहे. माझी राजकीय सुरुवात येथून झाली. त्यावेळी मी देशात पहिल्या क्रमांकाची मते घेतली होती. या शहराचा कायापालट केला. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे."
राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, नवनाथ जगताप, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, माया बारणे, राजेंद्र जगताप हे इच्छुक होते. त्यांची मनधरणी करण्याचे काम तीन दिवसांपासून सुरू होते. नेते आणि इच्छुकांमधील चर्चांची खलबते सोमवारी दिवसभर सुरू होती. तसेच या मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटानेही दावा केलेला होता. त्यामुळे तिघांपैकी नक्की हा मतदारसंघ कोणाला सोडला जाईल, याबाबत उत्सुकता होती. अखेर आज सकाळी नाना काटे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नाना काटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.