अजित पवारांनी २०१९ मध्ये कापले सुलक्षणा शीलवंत यांचे तिकीट; शिलवंत यांनी दिले चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 03:38 PM2024-11-10T15:38:57+5:302024-11-10T15:39:37+5:30
अजित पवारांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे
पिंपरी : विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून सुलक्षणा शिलवंत यांचे तिकीट आपणच कापल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे मेळाव्यात दिली. त्यानंतर ‘लाडकी बहीण योजना राबविण्यापेक्षा लाडक्या बहिणीला सन्मान दिला असता तर आणखीनच कळवळा आला असता’, असे प्रत्युत्तर सुलक्षणा शिलवंत यांनी शनिवारी पवार यांना पत्रकारांशी बोलताना दिले.
पिंपरीतून २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून सुलक्षणा शिलवंत यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली होती. मात्र, ऐनवेळी उमेदवारी बदलली गेली. अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली. शिलवंत यांची उमेदवारी कोणी कापली, याची चर्चा शहरात सुरू होती. त्याबाबतचा खुलासा अजित पवार यांनी पिंपरीत पाच वर्षांनंतर केला. त्यावरून आताच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
आता अजित पवार गटाच्या बनसोडेंना पुन्हा उमेदवारी दिली गेली आहे, तर सुलक्षणा शिलवंत यांना शरद पवार गटाने रिंगणात उतरवले आहे. उच्चशिक्षित असलेल्या शिलवंत यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत असतानाही तगडे आव्हान उभे केले आहे. त्यांनी अजित पवार यांना दिलेल्या प्रत्युत्तराची चर्चा शहरात रंगली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
विधानसभेसाठी २०१९ मध्ये अण्णा बनसोडे यांना तिकीट कसे दिले, याविषयी अजित पवार म्हणाले, शरद पवार गटाच्या आताच्या उमेदवारांना आमच्या पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. पक्षाचे त्यांच्यावर फारच प्रेम होते, ते का कुणास ठाऊक. मात्र त्यांच्याबाबत अनेकांचे फोन आल्याने त्यांचे तिकीट कापून ऐनवेळी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मुकाई चौकात अण्णा बनसोडे यांना एबी फॉर्म दिला. तो सकाळी अकराच्या सुमारास भरण्यास सांगितला होता. त्यानंतर बनसोडे विजयी झाले होते.
सुलक्षणा शिलवंत यांनी दिले प्रत्युत्तर
सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की, मला २०१९ला गुणवत्ता बघून तिकीट मिळाले होते. अजित पवारांनी सांगितले असते की तू थांब, आपल्याला सुशिक्षित उमेदवाराची गरज नाही. तर मी नक्कीच थांबले असते. मी नक्कीच तुमचे ऐकले असते. अजित पवारांनी बैठकीत अशा पद्धतीने वक्तव्य करायला नको होते. अजित पवारांच्या या वक्तव्याचा जनता नक्की बोध घेईल.